« Back

पर्यटन स्थळे

'आता मोराची मुखई...'

शिरूर तालुक्यामध्ये मोरांचे दर्शन विविध गावांमध्ये होऊ लागले आहे. "मुखई' हे आणखी एक गाव विकसित होत असून आत्तापर्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक ओळख असलेल्या या गावाची ओळख आता "मोराची मुखई' म्हणून होऊ लागली आहे. गावात तब्बल पाचशेपेक्षा जास्त मोर असलेल्या या गावात कृषी पर्यटनही विकसित होत आहे. 

आणखी एक कृषीपर्यटन स्थळ या निमित्ताने उपलब्ध होत असल्याने जिल्हात आता मोराची मुखई नव्याने मयुरदर्शनासाठी प्रसिद्ध होत आहे. राष्ट्रीय पक्षी मोरांसाठी शिरूर तालुक्‍यातील मोराची चिंचोली प्रसिद्ध आहे. गावकऱ्यांच्या मयुरप्रेमाणे मोराची चिंचोलीत मोरांची संख्या जिल्ह्यात सर्वांत विक्रमी आहे. मोरांच्या चिंचोलीशी साधर्म्य पाळणारे पण मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे अगदी कोकणचा "फील' देणारे गाव म्हणून हल्ली "मुखई' विकसित होत आहे. 

वेळनदीचा विस्तीर्ण किनारा व चासकमानच्या उजव्या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्याने या भागात मोरांची संख्या वाढत चालली आहे. उसाचे फड, केळींच्या बागा, सीताफळ बागा, संत्री बागा, नारळाची बनं आणि मुख्य वाहतुकीच्या रस्त्यापासून कितीतरी आत नीरव शांततेचा परिसर असलेल्या या भागात तब्बल पाचशे पेक्षा जास्त मोर व लांडोर वास्तव्यास आहेत. गावकऱ्यांच्या प्रेमामुळे येथील मोरही चांगलेच माणसाळलेले आहेत. 

मोरांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धतेचा विचार करून गावात आता कृषी पर्यटनही विकसित होत आहे. मुखई गावापासून केवळ दीड किलोमीटर आत "निसर्ग कृषी पर्यटन स्थळ' नावाने जयसिंग येवले, राहुलकुमार येवले, भाऊसाहेब येवले व अमोल येवले आणि कुटुंबाने हे स्थळ विकसित केले आहे. भरगच्च नारळीच्या बनात मोरांची प्रत्यक्ष भेट, गावरान जेवण, एक एकर क्षेत्रातील तब्बल सात तलावांमध्ये नौका विहार, ट्रॅक्‍टर फेरी, बैलगाडी फेरी, मनसोक्त मासेमारी आणि केळी, संत्री, चिक्कू, डाळिंब, हुरड्यासह यथेच्छ बेत येथे अगदी कुणाही पर्यटकांनी सहज उपलब्ध असतो. 

पुण्यापासून ५० किलोमीटरवर मयुरदर्शनासाठी जाणाऱ्या मयुरप्रेमींसाठी आता ३० किलोमीटर अलीकडेच मयुरदर्शनासह कृषी पर्यटनही शक्‍य असून, लवकर पर्यटकांसाठी आवश्‍यक त्या सुविधा ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे वतीने उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती सरपंच अतुल धुमाळ यांनी दिली.

 

टाकळी हाजी येथील रांजणखळगे

रांजणखळगे रांजणगाव गणपतीपासून २४ किलोमीटरवर आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे रांजणखळगे आहेत; परंतु टाकळी हाजी व निघोज सरहद्दीवर असणारे असंख्य रांजणखळगे कोठेही नाहीत. कुकडी नदीत पाणी सोडल्यावर रांजणखळग्यात धबधबे तयार होतात. पाण्यामुळे रांजणखळग्यांची नक्षीही आकर्षक दिसू लागते. १९९० मध्ये या ऐतिहासिक रांजणखळग्यांची नोंद "गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस'ने घेतली.  

या भागातील रांजणखळगे बेसॉल्ट खडकातील सर्वांत मोठे रांजणखळगे आहेत. निसर्गाचा हा चमत्कार व देवावर असणारी श्रद्धा यामुळे राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. भूशास्त्राचे अभ्यासक आवर्जून हा निसर्गातील चमत्कार पाहण्यासाठी येतात. काही रांजणखळगे इतके जवळ जवळ आहेत, की त्यांच्या भिंती एकमेकांत मिसळून गेल्या आहेत. काही रांजणखळगे वर-खाली असे तयार झाले आहेत. हे सर्व एकमेकांना जोडल्यासारखे दिसतात. उन्हाळ्यात या ठिकाणी गेले, की रांजणखळगे व्यवस्थित पाहता येतात. पावसाळ्यात ही निसर्ग नक्षी पाण्याखाली जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत हे रांजणखळगे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.  हिरवीगार राने, रिमझिम पाऊस, थंडगार वारा, निसर्गातील नवलस्थान असलेले रांजणखळगे, पावसामुळे यातून वाहणारे फेसाळ पाणी, नदीकाठची मंदिरे यामुळे त्याचबरोबर श्रावण महिन्यातदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.  


---------------------------------
 

जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यातून वाहत येणाऱ्या कुकडी नदीचे पात्र या ठिकाणी विस्तारलेले आहे. परिसरातील यमाई देवीचे मंदिरही प्रेक्षणीय आहे. 

निघोजजवळच असणाऱ्या वडगाव दर्याचे लवणस्तंभ नि जीवाश्‍म, गुळुंचवाडीचा शिलासेतू येथे पाहावयास मिळतो. 

 

टाकळीहाजीजवळ कुकडी नदीच्या काठावर मळगंगा देवीचे पांडवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या समोर कुंड आहे. त्यात बाराही महिने पाणी असते. मंदिराच्या डावीकडे रांजणखळगे आहेत. नदीच्या एका काठावर शिरूर तालुक्‍यात थोरली मळगंगा, तर दुसऱ्या बाजूला नगर जिल्ह्यात निघोजजवळ धाकटी मळगंगा, अशी दोन मंदिरे आहेत. टाकळी हाजीतील देवीची मूर्ती स्वयंभू असून, या मंदिराचे बांधकाम दगडात केले आहे. चैत्र महिन्यात अष्टमीला या देवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेत आठ ते दहा लाख भाविक सहभागी होतात. नवरात्रात विधिवत पूजा, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होत असून, दसऱ्याला टाकळीहाजीतील मंडळी पालखी काढतात.

करण कृषी पर्यटन केंद्र - भांबर्डे, रांजणगाव गणपती

रंगीबेरंगी फुलझाडे, हिरव्यागार झाडीतून पायवाट विविधतेने नटलेले "करण कृषी पर्यटन केंद्र' हे शहरातील व ग्रामीण भागातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.

"कृषी पर्यटन' ही संकल्पना गावात, खेड्यापाड्यात कशी उत्तमपणे चालवता येऊ शकते याचे उदाहरण श्री. रमेश कारभारी संगपाळ यांनी दाखवून दिले आहे. ३१ डिसेंबर २००७ पासून रांजणगाव गणपतीपासून चार किलो मीटरच्या अंतरावर भांबर्डे येथे कृषी पर्यटन केंद्र साकारण्यात आले आहे. निसर्गरम्य वातावरणात रांजणगाव गणपती, मळगंगा देवी यांच्या सानिध्यात हे पर्यटन केंद्र आहे. पर्यटकांसाठी शेततळे, गांडूळखत प्रकल्प, विविध जातींची झाडे, भाजीपाला लावण्यात आला आहे. सुंदर फुलझाडांच्या मधून तयार केलेला रस्ता, मिटींगसाठी हॉल, तंबूत राहण्याची व्यवस्था, पक्षी, प्राणी तसेच लहान मुलांसाठी खेळणी, झोपाळे आदी सुविधा उपलब्ध आहेत.

निसर्गरम्य वातावरणात समारंभ, वाढदिवस तसेच एका दिवसाच्या सहलीसाठी पर्यटक भेटी देत आहेत. खास महाराष्ट्रीयन पद्धतीचे व्हेज, नॉनव्हेज जेवण मिळते. 

करडे येथील 'झुलता मनोरा'

शिरूर तालुक्यात अनेक एेतिहासिक वास्तू असून, काळाच्या ओघात या वास्तूंची दूरावस्था झाली. परंतु, करडे येथील 'झुलता मनोरा' आजही वैभवशाली पेशवेकाली एेतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेची साक्ष देत असून, इतरत्र काळाच्या ओघात एेतिहासिक वारशाच्या पाऊलखुणा पुसल्या जात असताना येथील ग्रामस्थांनी मात्र हा वारसा उत्तम प्रकारे जतन करून ठेवला आहे. 

शिरूर-सातारा रस्त्यावर शिरूर पासून १२ कि.मी. अंतरावर करडे हे सुमारे ३५०० लोकसंख्येचे गाव. या गावाला मोठा एेतिहासिक वारसा लाभला असून, पेशव्यांच्या काळात पेशव्यांच्या "करडमहाल' म्हणजेच कचेरी या ठिकाणी होती. या ठिकाणाहूनच आसपासच्या गावांतील कामकाज चालत होते. या ठिकाणी न्यायनिवाडा व गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम चाले. हे काम देशमुखांच्या वाड्यात चालत असे. याबाबतचे पुरावे व खाणाखुणआ अगदी काल-परवा पर्यंत अस्तित्वात होत्या, असे गावातील ज्येष्ठ अभ्यासक बबनराव बांदल गुरुजी सांगतात. सध्या मात्र हा वाडा जमिनदोस्त झाला आहे. त्याचप्रमाणे पेशव्यांची घोडो बांधण्याची जागा (पागा) याच ठिकाणी होती. आज ती भग्नावस्थेत असून, त्याच्याही भिंतींची पडझड झालेली आहे. या पागेलगतच एेतिहासिक वेस असून, या वेशीच्या कमानीवर उर्दू भाषेतील मजकूर कोरलेला आहे. वेशीचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्यामुळे गावचे सरपंच राजेंद्र जगदाळे पाटील, लंघेवाडीचे सरपंच संतोष लंघे, माजी सरपंच बबनराव वाळके गुरूजी यांनी स्वखर्चातून या वेशीची पुर्नबांधनी केली. यावेशीच्या जवळच एेतिहासिक तलाव असून, पूर्वी घोड्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा वापर करण्यात येत असल्याचे जाणकार सांगतात.

या एेतिहासिक ठिकाणांजवळच ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर असून, कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या मंदिराच्या समोरच एक उंच मनोरा असून, लांबून तो दिपमाळेसारखा दिसतो. हा मनोरा पेशव्यांच्या काळात बांधलेला असावा. या मनोऱयाच्या टोकाशी गेल्यावर लांबपर्यंतचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. हा मनोरा त्याकाळी टेहाळणीसाठी किंवा शत्रूसैन्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी बांधला असावा. मनोऱयाच्या वरच्या टोकाला जाऊन तो हलविल्यास मनोरा हलल्याचा भास होतो, म्हणून त्याला "झुलता मनोरा' म्हणतात. मात्र, मनोरा खरोखरच हलत असून, भास होत नाही, असा ग्रामस्थांचा ठाम विश्वास आहे.

वैशिष्टपूर्ण स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमना असलेल्या या मनोऱयाचे बांधकाम दगडी असून, बाहेरून तात्कालीन चुना व अन्य वस्तूंच्या मिश्रणाचा मुलामा दिलेला आहे. मनोरा अष्टकोनी असून, व्यास ७ फूट व उंची ७७ फूट आहे. बांधका साडेचार टप्प्यात असून, आतमध्ये चोवीस दगडी पायऱया आहेत. पायऱयांच्या सहाय्याने आजही सहज मनोऱयाच्या वरच्या टोकाला जाता येते. वरच्या बाजूस दोन चौकोनी छोट्या खिडक्या आहेत, यामुळे प्रकाश आतमध्ये येतो.

सध्या मनोऱयास गुलाबी, पिवळा, पांढरा व विटकरी रंगाचे आकर्षक रंगकाम करण्यात आले असून, त्यावर फडकणारा भगवा ध्वज लक्ष वेधून घेतो. अनेक वर्षांपासून उन, वारा, पाऊस यांचा सामना करत हा "झुलता मनोरा' आजही दिमाखात उभा असून, भारतीय पुरातत्व खाते, महाराष्ट्र शासन यांनी येथील एेतिहासीक वास्तूंची दखल घेऊन घोड्यांची पागा, पेशवेकालीन बारव व झुलता मनोरा या स्थळांचा एेतिहासिक दृष्टीकोनातून विकास केल्यास आगामी काळात करडे हे एक एेतिहासीक पर्यटनस्थळ म्हणून उदयास येऊ शकेल. 

चिंचोली मोराची

मलठण मार्गावरील गणेगावमधून चिंचोली गावात जाता येते. इथे असंख्य मोर आपल्या स्वागतासाठी तत्पर असतात. मोरांचे ते मुक्त वन पाहिले, की त्यांच्या नजाकतभऱ्या सौंदर्यपिसाऱ्याची खरी जाणीव आपल्याला होते. गावात पर्यटनासाठी अनेकजण येत असतात.